![]() |
| नारायणगाव येथे झाकलेली मानके या ग्रंथाचे प्रकाशन करताना उपस्थित मान्यवर . |
जुन्नर ता. २३ : (प्रतिनिधी)" प्रतिकूल परिस्थितीत विविध क्षेत्रात भरीव कार्य केलेल्या व्यक्तींचा समावेश असलेला 'झाकलेली माणके' हा ग्रंथ ऐतिहासिक ठेवा आहे." असे प्रतिपादन विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी केले.
नारायणगाव ता. जुन्नर येथे माजी आमदार वल्लभ बेनके यांच्या वाढदिवसानिमित्त 'झाकलेली माणके' या ग्रंथाचे प्रकाशन वळसे पाटील यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.
'सनय प्रकाशन'ने प्रकाशित केलेल्या या पुस्तकात जुन्नर तालुक्यातील प्रसिद्धी पासून दूर राहिलेल्या ९४ व्यक्तींच्या कार्याची माहिती असून या ग्रंथाचे संपादन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते इंजिनिअर जे. ल. वाबळे,आर्किटेक अरविंद ब्रम्हे, दैनिक सकाळचे जेष्ठ पत्रकार दत्ता म्हसकर व हरीओम ब्रम्हे यांनी केले आहे.
वळसे पाटील म्हणाले, जुन्नर तालुक्यात धरणे, बंधारे नव्हते तेव्हा दुष्काळी परिस्थिती होती. पोटासाठी कुटुंबातील एक सदस्य मुंबईसारख्या शहरात गेला मिळेल ते काम केले.प्रसिद्धीची अपेक्षा न बाळगता प्रतिकूल परिस्थितीत गावच्या विकासासाठी मदत केली. विविध क्षेत्रात यशस्वी काम केले अशा महान व्यक्तींचा समावेश 'झाकलेली मानके' ग्रंथात केला असल्याने पुढील पिढीला ही ऐतिहासिक माहिती पुस्तकरूपाने मिळणार आहे.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार अतुल बेनके होते. यावेळी शरद बँकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा, ग्रामोन्नती मंडळाचे कार्याध्यक्ष अनिल मेहेर, विघ्नहर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर, बाजार समितीचे सभापती संजय काळे, उपसभापती प्रकाश ताजणे, तहसीलदार रवींद्र सबनीस, शरद लेंडे, डॉ. सदानंद राऊत, गुलाब नेहरकर, बाळासाहेब बढे, अंकुश आमले, अमित बेनके,बाजीराव ढोले, गणपत कवडे, बाळासाहेब खिलारी आदी मान्यवर उपस्थित होते.
आमदार बेनके म्हणाले, "या ग्रंथाच्या माध्यमातून तालुक्याचा ऐतिहासिक समृद्ध वारसा जपण्याचे काम केले आहे. तालुक्यातील प्रत्येक घरातील एक व्यक्ती मुंबईला गेली. फळे, फुले, भाजीपाला व्यवसायातून प्रगती साधली. त्यांनी गावाची नाळ सोडली नाही. गावाला पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी त्यांनी योगदान दिले. सिंचन, रस्ते, वीज, शिक्षण, आरोग्य या पायाभूत सुविधा निर्माण करण्यामध्ये माजी खासदार निवृत्तीशेठ शेरकर, माजी आमदार शिवाजीराव काळे, माजी आमदार वल्लभशेठ बेनके, दिलीप वळसे पाटील यांचे मोठे योगदान राहिले आहे.
जे. एल. वाबळे व स्मिता वाबळे यांनी प्रास्ताविक व स्वागत केले. यावेळी सत्यशील शेरकर, संजय काळे यांची भाषणे झाली. हेमंत महाजन यांनी सूत्रसंचालन केले. आभार अरविंद ब्रह्मे यांनी मानले. यावेळी माजी सभापती शिवाजीराव खैरे,ज्येष्ठ नागरिक संघाचे रत्नाकर आवटे,सुधाकर वाडकर, ग्राहक पंचायतीचे बाळासाहेब औटी, कवी शिवाजी चाळक,माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र बुट्टे पाटील, प्रकाश पाटील भुजबळ, इतिहास अभ्यासक बापूजी ताम्हणे , शिवनेरी भूषण विनायक खोत, किरण म्हसकर तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर मोठया संख्येने उपस्थित होते.
