मलाही उभं राहायचं' म्हणत शेरकर यांनी केला इरादा स्पष्ट
जुन्नर,ता.०२ : (प्रतिनिधी) निवडणुकीच्या धामधुमीत जुन्नर तालुक्यात लोकसभा निवडणुकीबरोबर विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने इच्छुक उमेदवारांची मोर्चे बांधणी सुरू झाली आहे.
लेण्याद्री येथे मामाचं गावं कृषी पर्यटन केंद्राच्या उदघाटन प्रसंगी झालेल्या कार्यक्रमात श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर यांनी 'मलाही उभं राहायचं!' असं म्हणत आपला इरादा स्पष्ट केला आहे.
शिरोली बुद्रुकचे माजी सरपंच लक्ष्मण शेरकर यांनी सुरू केलेल्या कृषी पर्यटन केंद्राच्या उदघाटन प्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती ॲड. संजय काळे व्यासपीठा समोरील पहिल्या रांगेतील खुर्चीत बसल्याचे पाहून शेरकर यांनी काळे यांना सन्मानपूर्वक व्यासपीठावर नेऊन बसविले. यावेळी ॲड. काळे यांनी शेरकर यांना देखील व्यासपीठावर बसण्याचा आग्रह केला मात्र व्यासपीठावर न बसता काळे साहेब तुम्ही बसा मला उभे राहायचे आहे असे म्हणताच काळे यांनी शेरकर यांना टाळी देत त्यांच्या म्हणण्याला पाठींबा देखील दिला.
दरम्यान शेरकर यांनी विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली असल्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा असून गेल्या काही महिन्यांपासून तालुक्यातील लहान मोठ्या कार्यक्रमांना, राजकीय सभा,बैठकांना,जयंती, उत्सव, यात्रा, जत्रा, उरूस लग्नसमारंभ, पूजा, वाढदिवस यासारख्या सार्वजनिक कार्यक्रमांना आवर्जून उपस्थित राहत असल्याचे दिसून येत आहे. शेरकर यांच्या समर्थकांनी देखील यादृष्टीने मोठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे.
ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी कार्यक्रमाचे निमित्ताने शेरकर यांची भेट घेतली आहे. तटस्थ असणारे जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांनी विकासाच्या मुद्द्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांचेंबरोबर राहण्याचा निर्णय घेतला आहे.लोकसभा निवडणुकीसाठी झालेली महायुती व महाविकास आघाडी विधानसभेसाठी कायम राहिल्यास शेरकर यांना महायुतीकडून उमेदवारीची संधीमिळू शकत असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. विघ्नहर कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष माजी खासदार स्व. निवृत्तीशेठ शेरकर यांची पुण्याई सत्यशील शेरकर यांच्या कामाला येऊ शकते. तसेच विघ्नहर साखर कारखाना चांगल्या प्रकारे चालवून त्यांनी आपली सहकारातील चुणूक दाखवून दिली आहे. सर्व पक्षातील नेते तसेच कार्यकर्त्यांशी त्यांचे सलोख्याचे संबंध आहेत. युवा सहकारी मोठ्या संख्येने त्यांचे सोबत असतात. शिरोली ग्रामस्थांची एकमुखी साथ शेरकर यांना मिळू शकते. यामुळे आगामी विधान सभा निवडणुकीत शेरकर यांच्या रूपाने एक कोरी पाटी निवडणूकीच्या रिंगणात असेल अशी चर्चा आहे.
विधानसभा निवडणुकीत आमदार अतुल बेनके, माजी आमदार शरद सोनवणे, भाजपा नेत्या आशा बुचके देखील इच्छुक आहेत. त्यांनी देखील आपापल्या परीने निवडणुकीसाठी व्यूहरचना आखण्यास सुरवात केली आहे.
-------------------------------------------------
मलाही उभं राहायचं' म्हणत शेरकर यांनी केला इरादा स्पष्ट
April 04, 2024
0