नारायणगावला जुन्नर तालुका माजी सैनिक संघाच्या कार्यालयाचे उदघाटन
आमदार अतुल बेनके, माजी आमदार शरद सोनवणे, सरपंच योगेश पाटे, कृषीरत्न अनिलतात्या मेहेर, ग्रुप कॅप्टन डॉ.लक्ष्मीकांत मंडलिक (नि.)ऑफीसर, इ.सी.एच.एस. पुणे, कर्नल तान्हाजी अरबुज (नि.) ग्रुप कॅप्टन सुहास पाठक (नि.) अध्यक्ष, आरफोर्स असो. पुणे विंग कमांडर एस. केळकर (नि.), प्रकाशमामा पाटे, एकनाथ शेटे, अमितशेठ बेनके, राजेश मेहेर, व तालुक्यातील विविध भागातून आलेल्या माजी सैनिक, माजी सैनिक संघाचे पदाधिकारी, सदस्य व ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत नुकताच पार पडला. माजी सैनिकांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी कार्यालयाच्या जागेसाठी गेल्या सात वर्षापासून मागणी होत होती. नारायणगाव ग्रामपंचायतीच्या सर्व सदस्यांनी देशसेवा बजावणाऱ्या माजी सैनिकांना हक्काचे कार्यालय देण्याचा ठराव एकमताने मंजूर केला तसेच कार्यालयाच्या सुशोभीकरणासाठी कुठल्याही वस्तू कमी पडू नये म्हणून स्वखर्चाने सढळ हाताने नारायणगाव मधील अनेक योगदात्यांनी मदतीचा हात दिला. आमदार अतुल बेनके यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात स्वतः एक स्वखर्चाने संगणक व प्रिंटर येत्या दहा दिवसांत कार्यालयात बसून दिला जाईल असे सांगितले.
कार्यालयासाठी योगदान देणाऱ्या योगदात्यांना सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. या सोहळ्यास ३०० माजी सैनिक कुटुंब सहभागी झाले होते. मान्यवरांनी यावेळी मनोगत व्यक्त केले व माजी सैनिकाच्या समस्या जाणून घेतल्या.
माजी सैनिक संघाचे अध्यक्ष देविदास भुजबळ यांनी प्रास्ताविक केले. माजी सैनिक सुरेश भोर व रमेश खरमाळे यांनी सूत्रसंचालन केले. माजी सैनिक उमेश अवचट यांनी आभार मानले