चाकणला चाळीत बिबटया : दोन तासात सुटका
जुन्नर,ता.२० : वनविभाग आणि वन्यजीव एसओएसच्या दोन तासांच्या ऑपरेशनमध्ये चाकण ता.खेड येथील एका चाळीतील घरात बसलेल्या बिबट्याची सुटका करण्यात यश मिळाल्याने रहिवाशांनी सुटकेचा निश्वास सोडला.
पुणे-नाशिक महामार्गालगत असलेल्या चाकण शहरातील चाळ वस्तीतील रहिवाशांना मंगळवार ता.२० रोजी सकाळ बिबट्याच्या बातमीने जाग आली. तात्काळ या घटनेची माहिती वनविभागाला देण्यात आली आणि सकाळी सहा वाजता वन अधिकाऱ्यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. जुन्नरमधील माणिकडोह बिबट्या बचाव केंद्रातून कार्यरत असलेल्या वन्यजीव एसओएस टीमलाही बचाव कार्यात मदत करण्यासाठी पाचारण करण्यात आले होते. बचाव संघ सुरक्षा जाळ्या, सापळा पिंजरा आणि संरक्षक साहित्याने सुसज्ज होता.
वनाधिकारी आणि स्थानिक पोलिसांनी गर्दी नियंत्रणाच्या उपाययोजना राबवल्या तर वन्यजीव एसओएस पशुवैद्यकीय डॉक्टरांनी बिबट्याला सुरक्षित अंतरावरून हलवले. हा प्राणी सध्या वन्यजीव एसओएसच्या वैद्यकीय निरीक्षणाखाली आहे.
उपवनसंरक्षक अमोल सातपुते म्हणाले,"वाहनाने बिबट्याला धडक दिल्याचा संशय असून तो विश्रांतीसाठी जागा शोधण्याचा प्रयत्न करत होता. हा भाग दाट लोकवस्तीचा असल्याने बिबट्या दिसल्याने रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते मात्र कोणतीही अनुचित घटना टाळण्यासाठी प्रथम गर्दीचे व्यवस्थापन केले आणि आजूबाजूच्या परिस्थितीचा अभ्यास करून बचाव कार्य वेगाने आणि कार्यक्षमतेने पार पाडले.”
वन्यजीव एसओएसचे प्रकल्प व्यवस्थापक महेंद्र ढोरे म्हणाले, “बिबट्या एका अरुंद ठिकाणी बसला होता त्यामुळे घाबरलेल्या रहिवाशांनी स्वतःला घरात कोंडून घेतले. हा नर बिबट्या सुमारे सहा 6 वर्षांचा आहे. बिबट्या तात्पुरत्या निरीक्षणाखाली आहे.”
कार्तिक सत्यनारायण, सह-संस्थापक आणि सीईओ, वन्यजीव एसओएस म्हणाले, “अशा प्रकारची बचाव कार्ये अत्यंत संवेदनशील असतात आणि महाराष्ट्र वन विभाग अशा परिस्थितींना कुशलतेने हाताळण्याचे उत्कृष्ट काम करते. वन अधिकारी हे जमिनीवरील वन्यजीव संरक्षणाचे उत्तम उदाहरण आहेत आणि ते जंगले आणि त्यांच्या मौल्यवान बिबट्यांचे संरक्षण करण्यात अत्यंत कार्यक्षम आहेत.