जुन्नर भागातील सह्याद्रीच्या डोंगररांगांमध्ये मावळात इंग्रजहुकूमशाही विरुद्ध अनेक उठाव झाल्याचे दिसून येतात. सन १९३५ साली देखील या परिसरात पुन्हा बंडाची ठिणगी पसरली होती. इंग्रज राजवटीचा वरदहस्त असल्याने या भागात जुलमी सावकारशाहीची पायमुळे रोवली गेली. सावकारांचा जाच दिवसेंदिवस वाढत होता. रुपयाला चार रुपये व्याज सावकार वसूल करीत. व्याजाची रक्कम फेडताफेडता मुद्दल तशीच राहत असे. सावकार कर्ज वसूल करण्यासाठी जमिनीच्या कागदपत्रांवर अंगठे घेत , खोट्या केसी करत , घरातील अन्नधान्य , भांडी, गुरेढोरे घेऊन जात. प्रत्येकाच्या मनात सावकारांबद्दल असंतोष निर्माण झाला होता. उस्थळ (ता.जुन्नर) येथील कोंड्या हरी नवले याने सन १९४० साली थुगाव दरोड्यातील आपला जुना साथीदार पिल्या भिका बोऱ्हाडे व त्याचा भाऊ लव्हा भिकाजी बोऱ्हाडे यांच्या मदतीने सावकारांवर दरोडे घालण्याकरिता देवळे (ता.जुन्नर) गावाच्या जवळच्या महादेव कोळी लोकांची त्याने टोळी तयार केली.
सावकारांची घरे लुटणाऱ्या या बंडकऱ्यांच्या टोळीने पुणे , ठाणे , अहमदनगर , नाशिक व कुलाबा या पाच जिल्ह्यात अवघ्या चार - सहा महिन्यात (६ फेब्रुवारी १९४० ते १६ जून १९४० पर्यंत) जनतेला लुटणाऱ्या सावकार , वाणी , मारवाडी यांच्यावर तेरा दरोडे घातले. सावकार व लोकांनी फितुरी करू नये म्हणून करंजांळे येथील पोलीस पाटील आणि कोतुळ येथील मारवाडी या दोघांची नाके टोळीने कापली होती. बंडकऱ्यांनी गोरगरिबांना कधीच त्रास दिला नाही किंवा लुटले नाही. उलट आडल्या-नडलेल्याना सहकार्य करत. त्यामुळे परिसरातून टोळीला चांगले पाठबळ मिळाले होते.
कोपरे (ता.जुन्नर) गावच्या गुहेत कोंड्या नवल्याची टोळी लपली असल्याची पोलिसांच्या खबऱ्याने माहिती दिली. फितुरीने कोंड्याचा घात केला. कोंड्या नवला गोळी लागून ठार झाला. त्या नंतर सन १९४१ रोजी टोळीतील (बंडातील) ३१ पैकी २७ लोकांवर खटला सेशन्स कमीट झाला. या खटल्यात असलेले आरोपी खालील प्रमाणे : १) पिलाजी भिकाजी बो-हाडे २) लहू भिकाजी बो-हाडे ३) अनाजी बुधाजी साबळे ४) पुत्या हिरू साबळे ५) होणाजी रामजी साबळे ६) कुश्या ठमा साबळे ७) दगडू लक्ष्मण रडे ८) सोमा खंडू साबळे १०) जावजी बाळा रडे ९) हेमा सखाराम गोडे ११) गणपत रामजी घुटे १२) कुमा देवजी मोडक १३) धोंडू रामा साबळे १४) धोंडी गंगा मराडे १५) महादू दगडू न्हावी १६) दला चिमाजी उंबरे १७) सखा केसू कोकणे १८) रामा सांवळा कचरे १९) सोमा लुमा उंबरे २०) लक्ष्मण आबा दिघे २१) रामा तुका शिंदे २२) मारूती रामजी मेमाणे २३) देवजी सखाराम कारभळ २४) चिमा येसु बुळे २५) सोमा तुका कोकाटे २६) तुका गहिना नवले २७) विठू पांडू मुठे
हे बंडकरी स्वतःच्या घरादारावर तुळशीपत्र वाहून फक्त गोरगरीब समाजाच्या अन्याय, अत्याचारविरुद्ध प्राणपणाला लावून लढले. लढता लढता काही शहिद झाले. जुलूम करणाऱ्या सावकारांविरुद्ध सुरू झालेले हे संघर्षाचे बंड आजारामर झाले. सुवर्णाक्षरांनी लिहिलेल्या जुन्नरच्या इतिहासात मात्र या बंडकऱ्यांच्या वाट्याला एकांतपणाच आला.पुढील काळात जुन्नरच्या इतिहासात या बंडकऱ्यांच्या आठवणींना उजाळा देतील हीच अपेक्षा.
(हा लेख धावत्या वेगाने लिहिलेला लेख आहे)
संदर्भ - सावकारांचे कर्दनकाळ आदिवासी बंडखोर (डॉ.गोविंद गारे साहेब)
लेखन
किरण दि.म्हसकर (जुन्नर)©️
मो.नं - 9011110569
