पुणे | महाराष्ट्र राज्यात सत्ता संघर्षाचे वारे वाहत आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पक्षाशी बंडखोरी करणाऱ्या एकनाथ शिंदे गटाविरुद्ध कडक पाऊले उचलली आहेत.अशातच शिरूर मतदार संघातील मा.खासदार , शिवसेनेचे उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील यांची देखील पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. पक्ष विरोधी कारवाया केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून पत्रक काढून याबाबतची माहिती देण्यात आलेली आहे.
एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर पुण्यात आयोजित शिवसेनेच्या समर्थन मेळाव्यात शिवाजीराव आढळराव पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमुळे शिवसेना संपत चालली आहे असे वक्तव्य केले होते. यासोबतच पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी याबाबत विचार करण्याचा सल्ला देखील दिला होता.त्यानंतर एकनाथ शिंदे भाजपशी सलगी करून मुख्यमंत्री झाले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना शुभेच्छा देताना शिवाजीराव आढळराव पाटील यांनी ‘गर्जत राहील आवाज हिंदुत्वाचा अभिनंदन मुख्यमंत्री साहेब’ असं म्हटलं होतं. ही पोस्ट आढळराव यांच्या अधिकृत फेसबुक आणि ट्विटर अकाऊंटवरून शेअर करण्यात आली होती.
